Thursday, June 13, 2013

एका ’फूल’झाडाची कहाणी

एका ’फूल’झाडाची कहाणी

एका माळरानावर एक फुलझाड होतं. अगदी साधंच होतं ते. फुलांना विशेष असा काही रंग किंवा गंध नव्हता. पण त्या माळरानावर ते एकच फुलझाड असल्याने तिथल्या परिसरातल्या मधमाश्या, फुलपाखरे यायची आणि मध पिउन जायची. कोणि एकदुस‌‌‌र्‍याशी काही बोलत नसायचं. सगळं कसं यांत्रिकपणे चालू होतं. त्या झाडाला ती पाखरे येतात म्हणुन काही सुख नव्हतं ना अश्या माळरानात राहण्याचं दु:ख. जगणं म्हणजे वेगळं काही असतं का? असा प्रश्न पण त्या झाडाला पडला का कधी काय माहित !
एके दिवशी जोराचा वारा सुटला होता. एक मस्त रंगी-बेरंगी फुलपाखरु रस्ता चुकलं आणि जोराच्या वार्‍याने उडत त्या माळरानावर पोहोचलं. वार्‍यापासून बचाव म्हणुन त्याने त्या फुलझाडाच्या फांदीचा आधार घेतला. त्या झाडाने पण प्रयत्न केला त्या फुलपाखराला आडोसा देण्याचा. वारा थांबला तेव्हा फुलपाखराने त्या झाडाचे आभार मानले आणि ते तिथुन निघाले.
दुसर्‍या दिवशी ते फुलपाखरु पुन्हा त्या झाडापाशी आले. त्या झाडाने ओळखले त्या फुलपाखराला, पण सवयीप्रमाणे ते स्वत:हून काही बोलले नाही. मग फुलपाखराने विचारले, ’कित्ती उजाड माळरान आहे ना हे?’. झाडाने फ़क्त मान डोलावली. ’तुम्हाला कंटाळा नाही का येत इथला?’. आता त्या पाखराला कोण सांगणार की ते झाड स्वत:हून ती जागा सोडुन कुठे जाणार, पण पाखराची बडबड आपली चालुच होती. ’आमच्या तिकडे कि नाही खुप मस्त झाडे आहेत, रंगी-बेरंगी फुलं, बरेच पक्षि, फुलपाखरे. खुप खुप मजा असते तिकडे! ’.
बराच वेळ चाललेल्या बडबडीला कंटाळून त्या फुलझाडाने फुलपाखराला विचारले, ’हे सगळं तु मला का सांगतोस? आणि इतकं सगळं तिकडे छान असताना तु इकडे काय करत आहेस.’
’मी कालच्या वार्‍यामुळे इकडे उडत आलो, आणि आता रस्ता चुकलो आहे. कालपासुन रस्ता शोधतोय पण काहीच सापडत नाहीए’, फुलपाखरु उत्तरले.
फुलपाखराचा रडवेला चेहरा पाहून त्या झाडाला त्याचे वाईट वाटले. ते त्या पाखराची समजूत काढण्यासाठी म्हणाले, ’काही काळाजी नको करु. माझ्याकडे एक पक्षी राहतो, तो भटकत असतो दिवसभर इकडे-तिकडे. त्याला माहीत असेल तुझं गाव. त्याला आपण सांगु, तो शोधेन रस्ता आणि सांगेल. तोपर्यंत तु इथे रहा.’  .
असं सांगत त्या झाडाने त्याच्या एका फांदीवरचे एक ताजेतवाने फुल पुढे केले. ते पाहून ते फुलपाखरु खुष झाले आणि आनंदाने बागडु लागले. खरं पाहता त्या पाखराला याहूनही खुप सुंदर, सुगंधी, रंगी-बेरंगी फुलांची सवय, पण का काय माहीत आजइतके खुष ते कदचित कधीच नव्हते. फुलझाडाला तर हे सगळे नविनच. नेहमी येणारी पाखरे फक्त मध प्यायची आणि निघुन जायची.
या फुलपाखराने त्या फुलातला मध चाखला. फुलपाखरू त्या मधाच्या चवीमधे हरवून गेले. मध पिउन संपला तरी ते भानावर काही आले नाही. मग झाडाने फांदी हलवुन उठवले आणि विचारले, ’काय झाले? कुठे हरवलास?’.
’तु या अशा माळरानावरचं झाड, आणि तुझ्या फुलांमधे असा सुमधुर रस.. कसं शक्य आहे? मी जिथुन आलोय तिथे इतकी फुलझाडे आहेत, विविध रंगांची उधळण करणारी फुले आहेत तिथे. पण आजपर्यंत मी असा मध चाखला नाही. काय गुपित आहे तुझ्याकडे?’, फुलपाखरू एकदम हरवून गेले होते त्या मधाच्या स्वादामधे.
या झाडाला काहीच कळत नव्हते. असं काही आपल्याकडे असामान्य आहे हे कोणि कधी बोललं नव्हतं आजपर्यंत त्याच्याशी..
’सांग ना.. खरंच काहीतरी विशेष आहे तुझ्याकडे’. फुलपाखराचं चालुच होतं.
’मला नाही रे माहीत की माझ्या फुलांमधे असे काही माधुर्य़ आहे आणि आजपर्यंत मला कोणि हे सांगितलं पण नाही. असो, तुला आवडले ना.’.
’बाकीच्यांना खरचं कळतं नसेल तु काय चिज आहेस ते. पण तुला पण माहित नाही हे आश्चर्य!’, फुलपाखरु म्हणाले.
ते फुलझाड हे ऐकुन थोडे ओशाळलेच. थोडेसे स्मित करुन अजुन एक फुल त्या फुलपाखरासमोर केले. पुन्हा ते पाखरु मधाच्या चवीमधे हरवून गेले.

झाडाने त्याच्याकडे राहणार्‍या पक्षाला त्या फुलपाखराचे गाव शोधायला सांगितले.
पुढचे काही दिवस ते फुलपाखरु त्या माळरानावरच राहू लागले. दिवसातला बराचसा वेळ ते त्या झाडासोबत असायचे. त्या फुलपाखराला खुप गप्पा मारायला आवडायच्या.झाडाला जरी हे नविन असले तरी सगळे आता आवडु लागले आणि हळुहळु ते झाड पण गप्पा मारायला शिकले.
झाडाने माळरानावरचे किस्से पाखराला सांगितले. बर्‍याचदा पाणि नसताना कसे प्रसंग यायचे तिथल्या जनजिवनावर. तरीपण हे झाड कसे तग धरून आहे.
इतकी फुलपाखरे , पक्षि त्या झाडावर यायचे , राहायचे. पण या फुलपाखराशी काही वेगळेच नाते जुळले होते. फुलपाखराकडे त्यामानाने खुप जास्त अनुभव होते. ते सगळे ऐकताना त्या झाडाला वाटायचे की आपण पण अश्या ठिकाणी जन्माला यायला हवे होते. मग हे पाखरु आपल्याला खुप पुर्वीच भेटले असते. जीवन किती सुखी असते. आता याच्या गावाचा शोध लागला की ते पुन्हा परत जाणार त्याच्या गावी, आणि पुन्हा आपण एकटे.
खुपच विचित्र असे सगळे विचार त्या झाडाच्या डोक्यात फ़िरु लागले.
फुलझाडावर राहणारा पक्षि एके दिवशी फुलपाखराच्या गावाचा शोध लावुन आला आणि त्याने ते पाखराला सांगितले. फुलपाखरु पण या झाडासोबत इतके रमले होते इथे माळरानावर त्याने परत गावाला जायचा निर्णय पुढे ढकलला.
मस्त गट्टी जमली होती दोघांची.
फुलझाड पण आता पुर्वीपेक्षा जास्त फुललेले असायचे. फुलेही थोडीफार रंगीबेरंगी दिसु लागली होती. पण आता इतर पाखरांना तिथे काही मिळत नसायचे. असेही इतर पाखरे फक्त मधासाठीच येत असायची त्यामुळे झाडाला त्याचे काही दु:ख नव्हते. त्यांच्याशी काही बोलने नसायचेच.
पुढचे काही दिवस मजेत चालले होते. मधे एकदा ते फुलपाखरु सकाळपासुन त्या झाडाकडे फिरकलेच नाही. झाडाला काळजी वाटु लागली. दुसर्‍या दिवशी ते परतले तेव्हा झाडाने विचारले तर फुलपाखरु म्हणाले, ’काही नाही. असंच माझ्या गावी गेलो होतो. काय झालं?’.
’काही नाही. तु आला नाही काल पासुन तर मला काळजी वाटत होती म्हणुन विचारलं. बरं ठिक आहे, हे बघ नवीन कळी उमलतीय तिथे वर. यावेळी थोडी वेगळी छटा देण्याचा प्रयत्न केलाय, कसा आहे?’, झाड म्हणाले.
पाखराने ते पाहिले आणि ’छान !’ असे उत्तर दिले, पण ते नेहमी सारखे वाटले नाही. कोरडेपणा जाणवला त्यात.
पुढे काही दिवस अधुन-मधुन फुलपाखरु असे गायब होऊ लागले. झाडाला काही समजत नव्हते की काय झालंय. एके दिवशी झाडाने विचारले तेव्हा फुलपाखरु भडकले आणि म्हणाले,’ मी एक फुलपाखरु आहे, इकडे-तिकडे बागडणे हा माझा स्वभाव आहे. मला कोणि बांधुन ठेवू शकत नाही’.
हे ऐकून फुलझाड बिचारे निरूत्तर झाले.
दुसर्‍या दिवशी त्या झाडाने फुलपाखराची माफ़ी मागितली आणि म्हणाले, ’ मी तुला इथे बांधुन नाही ठेवत आहे. फक्त तु नसला कि मला करमत नाही म्हणुन विचारले. खरंच मला माफ़ कर.’
आता फुलपाखराच्या गप्पा पहिल्यासारख्या होत नव्हत्या. झाडाचा मुळत:च स्वभाव शांत आणि दिवसभरात त्या माळरानावर असे काही विशेष न घडल्याने बोलण्यासाठी काही विषय नसायचा.
फुलपाखराचे इतर ठिकाणी बागडणे चालुच होते. पण आता या फुलझाडाशी पहिल्यासारखे जवळीक दाखवत नव्हते.
एके दिवशी पुन्हा ते असेच गायब झाले, ते पुन्हा न परतण्यासाठीच. झाडाने खुप वाट पाहिली. पण महिना झाला तरी ते फुलपाखरु काही परतले नाहीच.
त्या झाडावर राहणार्‍या पक्षाने एके दिवशी त्या झाडाला सांगितले कि त्या माळरानापासुन काही अंतरावर एक खुप मोठी नविन बाग तयार केली आहे. तिथे भरपूर झाडे लावली आहेत. तर त्या पक्षाने त्या फुलपाखराला आधीही तिथे पाहीले होते आणि आताही ते फुलपाखरु तिथेच स्थायिक झाले आहे. ते तिथे मजेत राहत आहे आणि तु त्याची वाट पाहणे सोडुन दे.
हे ऐकून त्या झाडाला जो धक्का बसला, त्यातुन त्याला सावरता येईना. त्याच्या फुलांचा रंग फिका होउ लागला, पुढे तर नविन कळ्या-फुले उमलणे पण कमी झाले.
नविन पाखरे येणे तर आधी कमी झालेलेच होते, आता ते बंदच झाले. ते झाड आता त्या माळरानावर फक्त नावाला उभे होते. आधीही असाच यांत्रिकणा होता जीवनामधे. पण त्या आणि आजच्या परिस्थितीमधे एका ’आयुष्यभराचे’ अंतर होते. फुलपाखरुच होते ते शेवटी, हे त्या झाडाला समजायला मात्र उशिर झाला होता...
ते स्वत:शीच पुटपुटले...

"साथ सोडली मधेच तू अशी
कशी भरणार तुझी उणिव,
एकटा होतो तुला भेटण्याआधी
आज झाली एकटेपणाची जाणिव."

--


No comments: