एक मांजर येत असायची आमच्या घरी.. संध्याकाळी चहाची वेळ झाली की.. एके दिवशी तिने आमच्या घराच्या मागे छोटीशी बाग आहे तिथे २ पिल्लांना जन्म दिला. तिघांसाठी ती एकदम सुरक्षित अशी जागा होती. दोन्ही पिले तिथेच मोठी झाली. त्यांचे खेळ बघायला मजा यायची. नंतर ती मांजर आणि एक पिल्लू बाहेर पडले ते पुन्हा कधी दिसले नाहीत. पण एका छोट्या बोक्याला मात्र आमचे घर आवडले. त्याने तिथेच आपले बस्तान मांडले.
बोक्याच्या जातीला शोभणार नाही असा काहीसा (सुदैवाने) स्वभाव त्याचा होता - जसं की स्वत:हून त्याने कधी दुधाच्या भांड्याला तोंड लावलं नाही (अपवाद - एके दिवशी तुप कढवून थंड करायला ठेवले असताना दोन्ही लहान पिलांनी मस्त डल्ला मारला होता),- बोके सहसा माणसांजवळ येत नाहीत, ते त्याना आवडत नाहीत,मस्त खावं-प्यावं आणि कुठे उंचीवर चढून ताणून द्यावी, पण आमच्या बोक्याला मात्र एकदम आमच्या सहवासाची सवय झालेली. हॉलमधे बैठकीवर मस्त पसरण्याची त्याची सवय. त्याच्या अशा काही ’रॉयल’ सवयी पाहून माझ्या वडीलांनी त्याला ’महाराज’ असे नाव ठेवले होते.
| एका राजेशाही थाटात |
एकदम कुटुंबातीलच एक असा त्याचा घरामधे वावर होता. त्याच्या भुकेच्या वेळी किचन मधे जाउन मोठमोठ्याने आवाज द्यायचा, पण स्वत:हून कधी ओट्यावर चढुन दुधाला किंवा कुठल्या खाण्याला तोंड लावत नसे. आई त्याला सारखं रागावत असायची, पण जर कधी त्याच्या दुधाच्या वेळेवर घरी नाही आला कि सारखं त्याचं नाव काढायची. कधीकधी तो बाहेरचंच काही खावून यायचा आणि शांत पडून राहायचा, मग लक्षात यायचं की आज उंदीर किंवा पारव्याची शिकार झालेली असणार. एकदा असाच पारवा पकडला आणि सरळ घरात घेउन आला. मग त्याला बाहेर हाकलून द्यावं लागलं, पुन्हा मात्र असलं जे काही असेल ते बाहेरच खाऊन यायचं हे त्याच्या लक्षात आलेलं असावं. त्याने आमच्या घराबाजूला २-३ वेळा छोट्या-मोठ्या सापांना पण मारलं होतं.
आधी घराचं दार बंद असल्यावर बाहेरून आवाज द्यायचा, नंतर मोठा झाल्यावर दाराची कडी पण वाजवायला शिकला होता तो.
माझ्या भावाला मुलगा झाला, तेव्हा बोक्या १.५ - २ वर्षाचा असेल. बर्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की लहान मुल आहे तर बोक्याला आता घरामधे येऊ देउ नका . पण आमच्या घरामधे कोणीच ते मान्य केलं नाही. पण त्याला हे जाणवलं की घरामधे कोणितरी नविन पाहुणा आलेला आहे आणि सगळ्यांच लक्ष त्या नविन पाहुण्याकडेच आहे. दुरुनच पाहायचा तो हे सगळं. पुढे आम्ही बाळाला हॉलमधे बैठकीवर ठेवू लागलो. तेव्हांही तो त्याच्याकडे दुरुन पाहत असायचा. पुढे २-२ , ३-३ दिवस तो घरी यायचाच नाही. त्याला कुठेतरी हे कळुन चुकलं होतं की आपली जागा या नवीन पाहुण्याने घेतली आहे. नंतर असाच एके दिवशी जो तो गेला , पुन्हा कधी परतलाच नाही.. खुप शोधाशोध केली आम्ही, शेजारीपण विचारुन बघितलं, कोणिच त्याला पाहीलं नव्हतं.. कदाचित आम्हाला तेव्हा त्याच्या मनातलं समजायला उशिर झाला होता..
| डोळ्यातले निरागस भाव |


No comments:
Post a Comment